IndiaNewsUpdate : भारतात एकच धर्म मानला जातो आणि तो म्हणजे संविधान, मुख्तार अब्बास नक्वी यांनी तालिबान्यांना सुनावले

नवी दिल्ली : काश्मीरबद्दल बोलताना ‘अधिकारा’ची भाषा बोलणाऱ्या तालिबानच्या श्रीमुखात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी चांगलीच लगावली आहे. तालिबानच्या काश्मीरसंबंधी वक्तव्याला प्रत्यूत्तर देताना त्यांनी सुनावले कि , ‘इथे मशिदीत दुआ मागणाऱ्या लोकांवर गोळीबार केला जात नाही, ना बॉम्बने हल्ला केला जातो ना इथे मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जाते ना त्यांचे मुंडके आणि पाय कापले जातात ‘.
मुख्तार अब्बास नक्वी यांनी पुढे म्हटले आहे कि ,’भारतात सर्वांना आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. भारतात धर्माच्या नावावर अराजकता पसरवली जात नाही. इथे केवळ एक धर्म मानला जातो आणि तो म्हणजे संविधान. संविधानावरच देश चालतो आणि संविधानच सर्व स्तरांतील सर्व समाजाच्या नागरिकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देते’. ‘भारत आणि अफगाणिस्तानात खूप मोठं अंतर आहे. यासाठी आम्ही तालिबानला हात जोडून विनंती करतो की इथल्या मुस्लिमांची चिंता सोडून स्वत:वर लक्ष द्या’ .
‘मुस्लीम म्हणून तालिबानला भारतातील काश्मीमध्ये किंवा अन्य कोणत्याही देशात मुस्लिमांसाठी आवाज उंचावण्याचा अधिकार आहे. आम्ही आवाज उठवू’ असे वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने मीडियाशी बोलताना केले होते. याचे सणसणीत उत्तर देताना नक्वी म्हणाले कि , ‘तालिबानला भारतातील मुस्लिमांची चिंता करण्याची गरज नाही’ .