MumbaiNewsUpdate : कोरोना नियमांच्या पालनासाठी गणेशोत्सव काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई : कोरोना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व पोलीस स्टेशनना सतर्क राहावे, असे आदेश देण्यात आलेत. गणेशोत्सवा काळात मुंबई पोलिसांनी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई पोलीस येत्या गुरुवारपासून मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत. सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी सूचना देताना त्यांनी सांगितलं की, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी.
दरम्यान भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे. तसेच भक्तांना मंडपात येऊन दर्शन घ्यायचे असेल तर अशा भक्तांसाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी. जेणेकरुन भक्तांची जास्त गर्दी होणार नाही, असं आवाहनही मुंबई पोलिसांनी मंडळांना केलं आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण 13 विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असणार आहेत. मुंबईत एकूण 13 झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. हे पथक झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवेल. बुधवारी विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवासंदर्भातल्या सूचना दिल्या आहेत.