IndiaNewsUpdate : मथुरेत आता दारू आणि मांस बंदी , मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश

मथुरा : मथुरेमध्ये दारु आणि मांसविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश योगी सरकारने दिले असून सोमवारपासून हे आदेश लागू झाले आहेत. “यासंदर्भातील अधिकाऱ्यांना बंदी घालण्याबद्दलची आवश्यक कारवाई करण्याबरोबरच अशा व्यवसायांमध्ये असणामऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या निर्णयाबद्दलची घोषणा मथुरा येथे बोलताना केली.
कृष्णोत्सव २०२१ या जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना आदित्यनाथ यांनी भगवान श्री कृष्णाकडे करोना विषाणूचा खात्म करण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं. मोदींनी देशाला नवीन दिशा दिली असल्याचं सांगत योगींनी मोदींच्या कार्याचं कौतुक करत केंद्र सरकारने केलेल्या कामाला अगदी मोजक्या शब्दात लेखाजोखा मांडला. धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या स्थळांकडे यापूर्वी दूर्लक्ष केलं जात होतं. मात्र आता या शहरांकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचंही योगी यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना योगी म्हणाले कि , मांसविक्री करणाऱ्या आणि दारुची दुकानं असणाऱ्यांनी आता दूध विक्री करुन मथुरेला पुन्हा एकदा जुनी ओळख मिळवून द्यावी. मथुरा पूर्वी चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन करणारे शहर म्हणून ओळखलं जायचे असेही योगी म्हणालेत. “ब्रज भूमी साकारण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी निधी देण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कृती तसेच अध्यात्मक याचा सुरेख मेळ घालून हा भाग विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असेही योगी म्हणाले.