NarayanRaneNewsUpdate : राणे यांच्या अटकेनंतर न्यायालयात नेमके काय झाले ?

महाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. १५ हजार जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच, नारायण राणे यांनी भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
नारायण राणे यांना दुपारी अटक केल्यानंतर त्यांना महाडमध्ये आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. राणे यांचं वय आणि प्रकृती पाहता महाड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजार जातमुचलक्यांवर जामीन दिला आहे. तसेच, महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश कोर्टाने नारायण राणे यांना दिले आहे. त्याचबरोबर, भविष्यात यापुढे असे वादग्रस्त विधान करणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली आहे. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, नारायण राणे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला कि, नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा. तसेच राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. शिवाय नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले . अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.
कोर्टात काय झाले ?
सरकारी वकील भीषण साळवी यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले कि , नारायण राणे यांच्या विरोधात महाड, पुणे, नाशिक, ठाणे येथे चार एफआयआर दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम ५०० मानहानी, कलम ५०५ (२) गैरप्रकारांकडे नेणारी विधाने, कलम १५३ अ सामाजिक तेढ निर्माण करणे, या प्रकरणातील पुढील चौकशी करता ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी. त्यांनी मुख्यमंत्री पदाची गरीमा राखली नाही.
दरम्यान नारायण राणे यांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले कि , दाखल गुन्ह्यांत ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नाही, दाखल केलेले गुन्हे आणि अटक राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत त्यामुळे ७ दिवसांची कोठडी मागणे बेकायदेशीर आहे. शिवाय नारायण राणे यांचे वय ६९ वर्षे असून त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. तसेच त्यांना कलम ४१(अ) मध्ये नोटीस बजावण्यात आलेली नाही. कलम ५०० नुसार दाखल केलेला गुन्हा पिडीताने ( मुख्यमंत्र्यांनी) दाखल केला नसून तो अज्ञाताने दाखल केला आहे.