WorldNewsUpdate : सध्या काय चालू आहे अफगाणिस्तानात ? पंजशीरने तालिबान्यांच्या विरोधात का कसली कंबर ?

काबुल – अफगाणिस्तानातील ३४ प्रांतापैकी ३३ प्रांतावर तालिबानने पूर्णपणे कब्जा केला असला तरी पंजशीर या प्रांतावर अद्याप तालिबान कब्जा करू शकले नाही.त्यासाठी तालिबानींचे अनेक दहशतवादी पंजशीरवर हल्ला करण्यासाठी पोहचले आहेत. दरम्यान पंजशीरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद मसूदने तालिबानींना तगडी टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. मसूद आणि अफगाणिस्तानला स्वत:चा राष्ट्रपती घोषित करणारे अमरुल्ला सालेह तालिबानला शह देण्यासाठी तयारी करीत आहेत.
दरम्यान तालिबानने अहमद मसूदला सरेंडर करण्यासाठी ४ तासांचा वेळ दिला आहे. परंतु शरण जाण्यास मसूदने नकार दिला असून सरेंडर हा शब्द आपल्या शब्दकोशात नसल्याचे म्हटले आहे.यावर बोलताना मसूद म्हणाला की, तो तालिबानींसमोर झुकणार नाही. आम्ही सेव्हियत संघाशी टक्कर घेतली होती आता तालिबानींशी टक्कर घेत आहोत. मसूदचे वडील अहमद शाह मसूद हेदेखील अफगाणिस्तानातील तालिबानीविरोधात नेते होते. त्यांनी सेव्हियत संघ आणि तालिबानींविरोधात नेहमी लढाई केली आहे. तालिबान आणि अलकायदाने कट रचून अहमद शाह मसूद यांना ९/११ हल्ल्याआधी मारुन टाकले होतं. त्यानंतर त्यांचा मुलगा अहमद मसूद आता तालिबानला संपवण्यासाठी पुढे आला आहे.
तालिबान्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंजशीर हा प्रांत मसूदच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.जर तालिबानसोबत चर्चा अयशस्वी झाली तर युद्ध होण्यापासून कुठल्याही किंमतीत रोखलं जाऊ शकत नाही. पंजशीर प्रांतात जवळपास १० हजार सैन्य तैनात आहे. जे तालिबानी दहशतवाद्यांविरोधात पूर्ण ताकदीने लढण्यास तयार आहे.
दरम्यान, तालिबानने दावा केला आहे की, त्यांच्या लोकांनी पंजशीर घाटीला चहुबाजूने घेरले आहे. चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्याचसोबत अहमद मसूदला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळत आहे. अफगाणिस्तानातील मोठी लोकसंख्या तालिबानवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. काबुल एअरपोर्टवर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. जितक्या शक्य आहे तितक्या लवकर तालिबानच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. तालिबान अफगाणिस्तानातील नागरिकांना रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
दरम्यान अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान नवीन सरकार बनविण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्यापही अनेक जिल्ह्यांत तालिबानीदहशतवादी आणि अफगाणिस्तानी सैन्य समोरासमोर आहे. अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतातील अंद्राबमध्ये तालिबान आणि विरोधकांमध्ये भीषण लढाई सुरू आहे. अफगाणिस्तानच्या लष्कराने बानू जिल्ह्यात तालिबानचे कंबरडे मोडले आहे. तालिबानच्या जिल्हा प्रमुखांसह ५० तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. याशिवाय जवळपास २० तालिबानी दहशतवाद्यांना बंदीही बनवण्यात आले आहे.
पंजशीर प्रांताने केलेल्या एका ट्विटनुसार, तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. यापूर्वी, अफगाण सैन्याने बागलाण प्रांतात ३०० तालिबानी दहशतवादी मारले होते. बीबीसीच्या वरिष्ठ पत्रकार याल्दा हकीम यांनी बागलाणच्या अंद्राबमध्ये लपून तालिबानींवर केलेला हा मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले. तसेच, तालिबानविरोधी मंडळींनी दावा केला होता, की या हल्ल्यात त्यांनी ३०० हून अधिक तालिबीनी लोकांना ठार केले आहे.