MaharashtraNewsUpdate : मातंग समाजाच्या मयत व्यक्तीवर स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यास विरोध , ग्रामपंचायत कार्यालयासमोर केले अंत्यसंस्कार

सोलापूर : जाती द्वेषाचे अमानुष चित्र दाखविणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात समोर आली आहे. मातंग समाजातील मयत व्यक्तीवर गावातील लोकांनी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यास विरोध केल्याने मयताच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर अत्यंस्कार केले.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , माळशिरस तालुक्यातील माळेवाडी-बोरगाव येथे ही घटना घडली आहे. मागील आठवड्यात शनिवारी ही घटना घडली आहे. गावातील सरपंचाच्या भावाचे निधन झाले होते. सरपंचांचं गावातील उच्च जातीतील काही लोकांसोबत वाद होता. त्यामुळे त्यांच्या भावाचं पार्थिव जेव्हा स्मशानभूमीकडे नेण्यात येत असताना गावकऱ्यांनी रोखलं होतं. गावातील लोकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली. ‘आम्ही अंत्ययात्रा घेऊन शेतातून जात होतो. पण आम्हाला गावातील लोकांनी अडवलं होतं, एवढंच नाहीतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले पण पोलिसांनी सुद्धा आमची मदत केली नाही’, असा आरोप सरपंचानी केला.
या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मृतकाच्या कुटुंबीयातील सदस्य हात जोडून पोलिसांकडे विनंती करत आहे. अंत्यसंस्कारासाठी आम्हाला स्मशानभूमीत जाऊ द्यावी, अशी याचना करत आहे. पण, पोलिसांनी पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या गाडीची चावी सुद्धा काढून घेतली असल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
गावकऱ्यांनी रस्ता अडवून ठेवल्यामुळे संतापलेल्या दलित कुटुंबीयांनी पार्थिव गावातील ग्रामपंचायतीकडे घेऊन गेले आणि तिथेच प्रांगणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी या प्रकरणी सवर्ण समाजातील सात जणांना अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशियत आरोपींना अटक केली आहे. तसंच, दलित कुटुंबातील सात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.