IndiaNewsUpdate : आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा

नवी दिल्ली : देशातील सर्व स्वतंत्र कॉलेजेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट या कोर्सेससाठी कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा ठेवाव्यात अशा सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एआयसीटीईने घेतला आहे. देशातल्या इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, फार्मसी अशा महत्त्वाच्या तंत्रशिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम, प्रवेश आणि कॉलेजबाबत निर्णय घेणारी शिखर संस्था असलेल्याएआयसीटीईच्या या निर्णयाने या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
या आदेशानुसार वार्षिक आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एआयसीटीईने कॉलेजेसना सांगितले आहे. ट्यूशन फी-माफी योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना फीमध्ये रिबेट दिले जाणार आहे.एआयसीटीईने पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे, की सर्व स्वतंत्र कॉलेजेसना या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्येक कोर्सच्या एकूण मंजूर प्रवेशक्षमतेच्या पाच टक्के एवढ्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. तसेच, या जागा सुपरन्यूमररी प्रकारच्या असतील. म्हणजेच सध्या संस्थेत प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांमध्ये या जागा मिळवल्या जातील. अर्थात, आधीच्या शैक्षणिक वर्षात मंजूर प्रवेशक्षमतेच्या ५० टक्के जागा भरल्या गेल्या असतील, अशाच इन्स्टिट्यूटमधल्या कोर्सेससाठी या सुपरन्यूमररी प्रकारच्या जागा उपलब्ध असतील, असेही एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.
दरम्यान वार्षिक आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेले विद्यार्थी या सवलतीसाठी पात्र ठरणार असून, त्यांना केवळ ट्यूशन फी माफ केली जाणार आहे.तर बाकीची फी विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच असणे आवश्यक आहे. त्यांना पात्रतेत कोणत्याही प्रकारची सवलत नाही.
एखाद्या वेळी या वर्गातले विद्यार्थी उपलब्ध नसतील, तरीही अन्य कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, असेही एआयसीटीईने म्हटले आहे. या कॅटेगरीमधल्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्याकरिता शिक्षणसंस्था वेगळी व्यवस्था करतील, असेही एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.
या कॅटेगरीसाठी शिक्षणसंस्थांनी वेगळी गुणवत्ता यादी तयार करावी आणि त्याआधारे या कॅटेगरीतले प्रवेश केले जावेत, असेही एआयसीटीईने सांगितले आहे. प्रत्येक स्टँडअलोन संस्थेने आपले माहितीपत्रक आणि वेबसाइटवर ट्यूशन फी-माफी योजनेचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच, या संस्थांनी या कॅटेगरीमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची वेगळी यादी एआयसीटीईच्या वेबपोर्टलवर कम्प्लायन्ससाठी अपलोड करणेही गरजेचे असल्याचे एआयसीटीईने सांगितले आहे.