Tokyo Olympic : भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक , नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी !!

टोकियो : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावले आहे. दरम्यान भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. हे पदक अभिनव बिंद्राने नेमबाजीमध्ये मिळवले होते. त्यामुळे १२१ वर्षानंतर भारताने नीरजच्या निमित्ताने हि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकली आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून हे सुवर्ण पदक जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.
१२१ वर्षानंतर घडला इतिहास
आता पर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासावर ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्समध्ये आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. मात्र ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. त्यामुळे नीरजने १२१ वर्षानंतर हा इतिहास घडविला आहे.
निरजची एकूण कामगिरी
नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५ क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. नीरज भारतीय लष्करात नायब सुभेदार आहे. नीरज चोप्रा हा भारताचा भालाफेक क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. तो आज पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. २३ वर्षीय नीरज चोप्राने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकला होता.