CoronaIndiaUpdate : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोस नंतरही पडू शकते बूस्टर डोसची गरज : गुलेरिया

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आपल्याला बुस्टर डोसची गरज आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. डॉ. गुलेरिया पुढे बोलताना म्हणाले की, “भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बूस्टर डोसचीही गरज आहे.”
डॉ. रणदीप गुलेरिया पुढे बोलताना ते म्हणाले की, ” आपल्याला कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज भासणार आहे. कारण वेळेनुसार आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच भविष्यात विकसित होणाऱ्या कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंट्सपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपल्याला बूस्टर डोसची गरज आहे.”
लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस
एम्सच्या प्रमुखांनी म्हटलं की, सेकेंड जनरेशनची लस इम्युनिटीसाठी उत्तम ठरेल. कारण नवनव्या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरेल. ते म्हणाले की, वॅक्सीनच्या बूस्टर डोसचं ट्रायल सुरु झालं आहे. देशातील लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देऊन झाल्यानंतर सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या मोहीमेला सुरुवात करावी लागेल. भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. गुलेरिया यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत.
गुलेरिया पुढे म्हणाले की, “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचे पाऊल ठरु शकते. माझ्या माहितीप्रमाणे जायडल कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन ची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहीमेला सुरुवात होऊ शकते.