MumbaiCrimeUpdate : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह स्वत: देखील अडचणीत आले आहेत. परमबीर यांच्यावर मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अँटिलिया स्फोटक प्रकरणात पोलिसांचा समावेश असल्याचं समोर आल्यानंतर परमबीर सिंग यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते.
या प्रकरणात सध्या देशमुख यांची ईडी व सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र, त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. अॅट्रॉसिटी अंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण मिळवलं आहे. हे सगळं सुरू असतानाच आता ते आणखी एका प्रकरणात अडकले आहेत.