MaharashtraNewsUpdate : ईडीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून व्हिडिओ जारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडावर असून, देशमुख यांच्या मालमत्तांची झाडाझडतीही ईडीकडून केली जात आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारीही त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. आता अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडली आहे. तसेच ईडीसमोर कधी हजर होणार याबाबतही खुलासा केला आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांना या प्रकरणात आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले मात्र मात्र तीनही वेळा अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरे गेले नाही. मागील आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा शोध ईडीकडून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलेले आहेत.
अनिल देशमुख यांचा व्हिडिओद्वारे खुलासा
या व्हिडिओमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटले आहे कि , “ईडीने माझ्या कुटुंबियांची ४ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. चार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये माझा मुलाने २ कोटी ६७ लाखामध्ये २००६ मध्ये जी जमीन घेतली होती. ती २ कोटी ६७ लाखाची जमीन सुद्धा जप्त केलेली आहे. मात्र ३०० कोटीची असल्याचे सांगून काही जण गैरसमज पसरवत आहेत. मला ईडीचा समन्स आला होता. समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा जो काही निकाल येईल. त्यानंतर मी ईडीसमोर माझे स्टेटमेंट देईन”, असा खुलासा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात , अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून वसुली करण्याचे टार्गेट पोलिसांना दिले होते , असा आरोप केला होता. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही एनआयए न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा सीबीआयकडूनही तपास केला जात आहे.