CoronaIndiaUpdate : काळजी घ्या : दुसऱ्या लाटेची चर्चा सोडा , तिसरी लाट सुरु झालीय… !!

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे, स्वच्छता बाळगणे यासारख्या गोष्टींचा नागरिकांनी अवलंब करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनाची तिसरी लाट काही दिवसांतच फोफावत असल्याचे दिसून येईल, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे.
हैदराबाद : देशात सर्वत्र अद्याप दुसऱ्या लाटेची चर्चा असतानाच तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा संशोधकांनी केली आहे. हैद्राबाद विद्यापीठातील प्रसिद्ध भौतिकशास्त्र आणि गणितज्ञ डॉ. विपीन श्रीवास्तव यांनी गेल्या दीड वर्षातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा मॅट्रिक्सच्या आधारे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला असल्याचे वृत्त आहे.
प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बिपीन श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, दुसरी लाट ४ जुलै रोजी सुरु झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असेही डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
डॉ. श्रीवास्तव यांनी लाटेची सुरुवात नेमकी कधी होते, हे समजण्यासाठी मुख्यत्वे तीन प्रकारच्या आकडेवारीचा उपयोग केल्याचे सांगितले आहे. दैनंदिन आढळणारी रुग्णसंख्या, दैनंदिन बरे होऊन घरी जाणारी रुग्णसंख्या आणि दैनंदिन मृत्यू या तीन गोष्टींच्या आधारे लाटेची सुरुवात, कळस आणि लाट ओसरत असल्याचे सिद्ध करता येते , असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा वाढू लागते, तेव्हा परिस्थिती गंभीर होत असल्याचं मानले जाते . मात्र केवळ हा एकमेव निकष ग्राह्य धरता येत नाही. त्याबरोबरच जर दैनंदिन मृत्युंचे प्रमाण वाढत असेल आणि हे सलग काही दिवस होत असेल, तर मात्र ती नव्या लाटेची सुरुवात मानली जाते. ४ जुलैपासून ही परिस्थिती दिसायला सुरुवात झाल्याचे या आकडेवारीतून आणि मॅट्रिक्समधून स्पष्ट दिसत असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.