IndiaNewsUpdate : रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेले एकाच कुटुंबातील १५ जण बुडाले , ६ जणांचा मृत्यू

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेले एकाच कुटुंबातील १५ जण बुडाले. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेहही नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत तर ३ जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. या कुटुंबातील ६ जण वाचले आहेत. यातील ३ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शरयू नदीच्या काठावरील गुप्तार घाटावर हे कुटुंब स्नानासाठी उतरले होते.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , आग्रामधील सिंकदरा येथे राहणारे १५ जणांचं एक कुटुंब शुक्रवारी अयोध्येत पोहोचले. दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य गुप्तार घाटावर स्नान करत होते. तेवढ्यात कुटुंबातील दोन महिलांचा पाय घसरला आणि त्या नदीच्या मुख्य प्रवाहात सापडल्या. त्यांना वाचवण्यासाठी स्नान करत असलेले कुटुंबातील इतर सदस्य पुढे गेले. पण हे सर्वजण शरयू नदीच्या वेगवान प्रवाहात सापडले आणि वाहू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आणि बचावकार्य सुरू झाले. दरम्यान नदीत वाहत असलेले ३ जण पोहत कसे तरी बाहेर आले. ३ मुलींना स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने वाचवले . पण महिलांसह कुटुंबातील ९ जण वाहून गेले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. तीन तासांच्या शोधानंतर ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले परंतु अद्याप ३ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अनुज कुमार झा आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे बाचव पथक आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात येत आहे. गुप्तार घाटाच्या जवळील सर्व घाटांवर नगर ठेवली जात आहे. पोलिस ठाण्यांनाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अयोध्येत शरयू नदीच्या गुप्तार घाटावर १५ जण बुडाल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आणि बुडालेल्यांना लवकरात लवकर वाचवण्याचे आदेश दिले.