MaharashtraPoliticalUpdate : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन उद्यापासून, सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची संकेत आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील १०० विविध प्रश्न आम्ही मांडणार आहोत. सभागृहात वेळ मिळाला तर सभागृहात आणि नाही वेळ मिळाला तर बाहेर माध्यमांसमोर आम्ही प्रश्न मांडणारच असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवर टीका करताना फडणवीस यांनी म्हटले आहे कि, कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. राज्याच्या निर्मितीला ६० वर्ष पूर्ण झाली. पण जे ६० वर्षांत घडले नाही, ते आपल्याला आत्ता घडताना दिसत आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात आहे.
“उद्याचं आठवं अधिवेशन धरून एकूण कालावधी ३८ दिवस आहेत. सरासरी ५ दिवस देखील सरकारच्या काळात अधिवेशन चाललेलं नाही. कोविड काळात चाललेल्या अधिवेशनांचे एकूण दिवस बघितले तर ते १४ आहेत. त्याचवेळी संसदेचा विचार केला, तर कोविड काळात संसदेची ६९ दिवस अधिवेशनं चालली. कोविडच्या नावावर लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारच्या वतीने केलं जात आहे.”
फडणवीस माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले कि , महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रश्न आहेत. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, करोनाचे प्रश्न, लॉकडाउन असे अनेक प्रश्न आहेत. पण या विषयांवर बोलण्यासाठी कोणतंही आयुध आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं नाही. राज्याच्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलूच नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सभागृहात जे मांडता येईल, ते मांडण्याचा प्रयत्न करू. मांडता येणार नाही ते बाहेर माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर येऊन मांडू. अशा प्रकारे लोकशाचीही थट्टा तात्काळ बंद केली पाहिजे. राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढला आहे. हे सरकार अधिवेशनाचा सामना करू शकत नाही. ज्या प्रकारे वसुलीची प्रकरणं बाहेर येत आहेत, त्यामुळे अधिवेशनच फेस करायचं नाही, असा प्रयत्न सरकारचा दिसतोय. पण आम्ही सरकारचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही.