MaharashtraPoliticalUpdate : शरद पवार यांच्यासह दिलीप वळसेपाटील, जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्ष बंगल्यावर पोहोचले आहेत.तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आगमन झाले होते. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे .
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर हि बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले असून अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे. दरम्यान जर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल असे म्हटले जात आहे.
काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली होती त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. आणि आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. या भेटीची राज्याच्या वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.