OBCReservationAgitation : नेतृत्व तुम्ही करा पण आमचे आरक्षण वाचवा , भुजबळ यांचे फडणवीस यांना आवाहन

लोणावळा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केले. सर्व श्रेय त्यांनी घ्यावे, पण आमचे आरक्षण वाचवावे, असेही ते म्हणाले. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू असताना भुजबळ यांनी लोणावळा येथील ‘ओबीसी-व्हीजेएनटी न्याय हक्क समिती’च्या चिंतन बैठकीत हे आवाहन केले.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ‘‘पक्ष कोणताही असला तरी त्याने काही फरक पडत नाही, ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भांडणाऱ्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे. सर्व श्रेय त्यांनी घ्यावे, पण आमचे आरक्षण वाचवावे.’’ २०१६ मध्ये देशातील सर्व ओबीसींची माहिती संकलित करून केंद्राकडे देण्यात आली होती. ही माहिती न्यायालयात का सादर केली गेली नाही? केंद्रात भाजपचे सरकार असल्याने मी फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
दरम्यान विजय वडेट्टीवार म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहिले तर ओबीसी आरक्षणाचा मूळ मुद्दा बाजूला राहील. पक्षाचे विचार बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी लढायला हवे. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजासाठी एक झाले पाहिजे.
या बैठकीला मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अण्णा डांगे, माणिकराव ठाकरे, बबनराव ढाकणे, नारायण मुंडे, बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, अरुण खरमाटे, साधना राठोड आदींची यावेळी उपस्थितती होती.