IndiaNewsUpdate : शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी प्रज्ञा सिंह ठाकूरचे पुन्हा वादग्रस्त विधान

भोपाळ : भाजप खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
मालेगावात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रज्ञा सिंह ठाकूर आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात १०जण ठार तर ८२ जण जखमी झाले होते. तत्कालीन महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी त्यांना अटक करुन त्यांची चौकशी केली होती. याआधीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्यावर धक्कादायक विधान केले होते . आपल्या शापामुळेचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी करकरे ठार झाले, असे वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी केले होते . त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आताही त्यांनी पुन्हा एकदा करकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं.
यासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला, असं त्या म्हणाल्या आहेत. माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी करकरेंनी आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्य-शिक्षकाची बोटं आणि बरगड्या मोडल्या. मला खोट्या प्रकरणात गोवलं, असं आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. देशात १९७५ मध्ये पहिल्यांदाच आणीबाणी लागू झाली होती. तशीच एक आणीबाणी २००८साली लागल्याचं सांगत मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला गोवण्यात आलं आणि मला अटक झाली, असेही त्या म्हणाल्या.