CoronaMaharashtraUpdate : कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९५.९४ टक्के , राज्यात ९ हजार ६७७ नवे कोरोनाबाधित

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासात १० हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर ९ हजार ६७७ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ७२ हजार ७९९ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९४ टक्के इतके झाले आहे. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने राज्यात नवे संकट निर्माण केले असून या पार्श्वभूमवीर राज्य सरकारने सतर्कतेच्या उपाययोजना म्हणून सरकारने ५ टप्प्यांच्या नियमावलीमध्ये बदल करून राज्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे राज्यात करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. गुरुवारी १९४ असणारा मृतांचा आकडा शुक्रवारी मात्र खाली येत १५६ वर आला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांच्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यात आजपर्यंत १ लाख २० हजार ३७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आधारावर राज्यातला मृत्यूदर अजूनही २ टक्क्यांवरच स्थिर आहे.
दरम्यान, एकीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने १० हजारांच्या आसपास असताना गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ९ हजार ६७७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आजपर्यंत राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६० लाख १७ हजार ३५ झाला आहे. त्यामध्ये आजच्या आकडेवारीनुसार १ लाख २० हजार ७१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.