MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : सोमवारपासून मराठवाड्यातील पाच जिल्हे निर्बंधांच्या बाहेर

राज्य शासनाकडून कोरोना संसर्गाचा पुन्हा आढावा
मुंबई: गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता . या निर्णयानुसार जाहीर केल्याप्रमाणे आज शुक्रवारी राज्य सरकारने जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर केली आहे. या नव्या आकडेवारीनुसार, मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे मुंबईसह बहुतेक जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, त्यात मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच ४.४० टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याबद्दलचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
या निकषानुसार पाच स्तरापैकी पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा सुरू करण्यासही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार हे एकदोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
कोरोना संसर्ग पाच टक्क्याच्या खाली आलेले जिल्हे
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याने आज कोरोनाच्या स्थितीची १० जूनपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कोरोनाचा जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची माहिती आहे. त्यानुसार, मुंबई व उपनगर जिल्ह्यांसह नगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. तसंच, मुंबई वगळता बहुतेक जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत. या आकडेवारीच्या आधारे संबंधित जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी येत्या सोमवारपासून निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या जिल्ह्यांची अस्थिती अद्यापही गंभीर
दरम्यान मुंबईतील करोना संसर्गाचा दर कमी झाला असला तरी अद्यापही २७.१२ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. तर, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड सध्या फुल्ल आहेत. सातारा जिल्ह्यात ४१.०६ टक्के तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१.५९ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहेत. या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर अनुक्रमे १५.८५, ११.३० आणि ११.८९ इतका आहे.