ViralNewsUpdate : व्हायरल व्हिडिओत पत्नीला मारहाण करणाऱ्या हभप चिमणकरला अखेर बेड्या

कल्याण : अखेर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात स्वतः गुन्हा दाखल करून एक पथक आळंदीला रवाना केले . त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत.
घरात पाण्याच्या वादावरुन एका ८५ वर्षीय वृद्धाने ८० वर्षीय त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. महिलेला मारहाण करणारा इसमाचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. संबंधित घटना ही ३१ मे रोजी घडली आहे. गजानन बुवाच्या १३ वर्षीय नातवाने संबंधित प्रकाराचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्वतःला हभप म्हणविणाऱ्या नराधम वृद्ध पतीवर कारवाई करण्याची मागणी केली.
वृद्ध महिलेचा पती विरोधात तक्रार देण्यास नकार
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सदर कुटुंबियांचा शोध घेत वृद्धेला भेटून तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र वृद्धेने पती गजानन बुवा चिकणकर याच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. परिणामी अखेर सामाजिक दबाव लक्षात घेता पोलिसांनी स्वतः याबाबत मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन बुवा चिकणकर आळंदीला गेला होता. त्यामुळे पोलिसांचं एक पथक आळंदीला रवाना झालं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.