CoronaMaharashtraUpdate : राज्यात २१ हजार ७७६ रुग्णांना डिस्चार्ज , १३ हजार ६५९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : गेल्या २४ तासात शुक्रवारच्या तुलनेने राज्यात आज १३ हजार ६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत असल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वाढल्याने रिकव्हरी रेट ९५.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७ हजार ०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ करोनाबाधितांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील हे दिलासादायक चित्र पाहता शासनाने पुन्हा एकदा अनलॉक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यामध्ये ५ स्तर करण्यात आले असून ज्या जिल्ह्यांमध्ये कमी रुग्ण आहेत, तेथील निर्बंध प्राधान्याने हटवण्यात येणार आहेत. मात्र निर्बंध हटवले गेले तरीही नागरिकांना करोनाबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्याप करोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही.
सक्रिय रुग्णांचा आलेख पुन्हा २ लाखांच्या खाली
राज्यात आज रोजी एकूण १,८८,०२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये मुंबईतील १८ हजार ११८, ठाण्यातील १६ हजार ८०१, पुण्यातील २२ हजार २८०, साताऱ्यातील १५ हजार २४६, सांगलीतील १० हजार २८८ आणि कोल्हापुरातील १८ हजार १३० रुग्णांचा समावेश आहे. तसंच रत्नागिरीतही ५ हजार ७५९, सिंधुदुर्ग ५ हजार ५७२, सोलापूर ५ हजार ८६१, नाशिक ५ हजार ८८०, अहमदनगर ६ हजार ८३१, जळगाव ३ हजार ४३३ आणि बीडमध्ये ४ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.