MaharashtraCrimeUpdate : धक्कादायक : महिला पोलिसावर बलात्कार , पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा

वाशिम : वाशीम शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार करून मारहाण केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकावरच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. विश्वकांत गुट्टे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे.
वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात २००७ मध्ये विश्वकांत गुट्टे हे पीएसआय या पदावर कार्यरत असताना त्यांची पीडित पोलीस महिलेशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत ३० मे २०२१ रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे पीडितेच्या घरी गेले आणि त्यांनी जबरदस्ती करीत बलात्कार करून मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यावर ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत.