MumbaiNewsUpdate : मुंबई नेमकी कुठल्या गटात ?

मुंबई : मुंबई नेमकी कोणत्या गटात आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. व्यापारी, दुकानदार, स्थानिक यांच्यामध्ये हा संभ्रम असून त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये असल्याची माहिती महापौरांनी दिली. मात्र, याविषयी सविस्तर चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने मध्यरात्री उशीरा अधिसूचना जारी केल्यानंतर नेमकी नियमावली आणि मुंबई कोणत्या गटात असेल, तिथे काय नियम लागू असतील, यासंदर्भात मुख्यमंत्री संध्याकाळपर्यंत घोषणा करतील, अशी माहिती यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के आहे. कालच्या तपासणीमध्ये एकूण ९६३ नवे रुग्ण तर बरे झालेले रुग्ण १२०७ आहेत. कालपर्यंत रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के आहे. तसेच रुग्ण दुपटीचा दर ५१५ दिवसांचा आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा रेट ५.३१ वर आहे, तर ऑक्सिजन बेड ३२ ते ३४ टक्क्यांपर्यंत ऑक्युपाईड आहे. त्यामुळे आपण तिसऱ्या गटामध्ये आहोत. त्यामुळे येत्या सोमवारपासूनच्या अनलॉकच्या पहिल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या गटामध्ये असू शकते. मात्र यासंदर्भात संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील”, असं त्या म्हणाल्या.
“राज्य सरकारने ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक गटासाठी निकष दिले आहेत. त्यानुसार शहरांची किंवा जिल्ह्यांची विभागणी केली जाणार आहे. आपण आत्ताच्या घडीला तिसऱ्या गटात आहोत. यानुसार जी नियमावली मुख्यमंत्र्यांकडून सांगितली जाईल, तेव्हा त्यानुसार आपल्याला नियम पाळावे लागतील. संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल”, असं देखील महापौरींनी स्पष्ट केलं.
लोकलची प्रतीक्षा करावी लागणार
“राज्य किंवा केंद्राच्या नियमावलींचा आढावा घेऊन मुंबईत कोणते नियम पाळावे लागतील, यासंदर्भात पालिका स्वतंत्र परिपत्रक काढेल. लोकल प्रवासाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून घेतील. त्या निर्णयानुसार आपण कार्यवाही करणार आहोत”, अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली.
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे. अशाच ठिकाणी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा ५.२५ टक्के असून, ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही जवळपास ७.५४ टक्क्यांच्या जवळपास आहे. पॉटिव्हिटी रेटनुसार दोन्ही जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या गटात होतो. त्यामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
तिसऱ्या गटात येणाऱ्या जिल्ह्यात कोणते निर्बंध हटणार?
अत्यावश्यक दुकानं सकाळी ७ ते २ आणि इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुली राहतील, मॉल्स थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेनं दुपारी २ पर्यंत खुली राहतील, तर त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार रविवार बंद राहतील. लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० टक्के क्षमतेनं खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू असणार आहेत. सोमवार ते शनिवार स्टुडियोत चित्रीकरण करता येणार आहे. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेसह दुपारी २ पर्यंत खुले असणार आहेत. बांधकामांना दुपारी दोन पर्यंत मुभा असणार आहे. जमावबंदी\संचारबंदी कायम राहणार आहे.