CoronaMaharashtraUpdate : रुग्ण संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांना मिळू शकतो थोडा दिलासा पण ….

मुंबई : केंद्र सरकारने जून अखेरपर्यंत लॉक डाऊन चे निर्बंध कायम राहतील असे आदेश जारी केले असले तरी त्यात हे अधिकार राज्यांना असल्याचे म्हटल्याने राज्य सरकारची जबाबदारी अधिक वाढली आहे. मुळात एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांपासून राज्यात निर्बंध लागू झाल्याने दुकानदार , व्यावसायिक सरकारवर पूर्णतः नाराज आहेत. खायचे काय ? जगायचे कसे आणि कोरोनाशी सामना करायचा कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे . दरम्यान १ जूनपासून दुकाने उघडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाची स्थिती सुधारत असली तरी , २१ जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग कायम असून, म्युकरमायकोसिसच्या संकटाचा धोका लक्षात घेऊन टाळेबंदीत १५ दिवस वाढ करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली. काही निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा वाढविण्यासह अन्य काही सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. उपनगरी रेल्वे प्रवासावरील निर्बंध मात्र कायम राहतील. कारण सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. आरोग्य विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोरोनास्थितीवर सादरीकरण करताना, २१ जिल्ह्यांतील रुग्णवाढ राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून, १०-१५ जिल्ह्यांत रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आणले.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेतून सर्वसामान्य प्रवाशांना आणखी महिनाभर तरी प्रवास करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास मुभा आहे. यात आणखी कोणत्या घटकांना परवानगी दिली जाणार नाही. रेल्वे परवानगीबाबत १५ जूनपर्यंत तरी विचार होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
ग्रामीण भागात वाढत आहे कोरोना
राज्यातील टाळेबंदी पूर्ण उठवायची की टप्प्याटप्प्याने शिथिल करायची, अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकारी मंत्र्यांना केली. त्यावर काही जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर असल्याची बाब मंत्र्यांनी निदर्शनास आणली. रुग्णवाढीचे प्रमाण हळूहळू कमी होत असले तरी ग्रामीण भागांत ते वाढत आहे. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारीइतकी झाली आहे. मात्र आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. टाळेबंदीत वाढ करावी आणि टप्प्याटप्प्याने काही निर्बंध शिथिल करावेत, असा मंत्रिमंडळाचा सूर होता असे वृत्त आहे.
व्यापाऱ्यांनी सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली असली तरी सरकारच्या पातळीवर अद्याप विचारविनिमय सुरू आहे. सध्या सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनावश्यक दुकाने उघडी ठेवता येतात. ही वेळ दुपारी २ पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. अन्य दुकाने आणखी आठवडाभर तरी उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सांगण्यात येते. दरम्यान आरोग्य विभाग आणि कृती दलाशी चर्चा करून कोणते निर्बंध शिथिल करावेत, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार आहेत. दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात २१,२७३ नवे रुग्ण
राज्याचा रुग्णआलेख घसरत असून, गुरुवारी मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१,२७३ नवे रुग्ण आढळले असून, ४२५ जणांचा मृत्यू झाला. जवळपास दोन महिन्यांनी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यात सध्या ३ लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३,८६९ रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. २४ राज्यांमधील उपचाराधीन रुग्णसंख्याही घटत असून, करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. मात्र चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणातही गेल्या तीन आठवड्यांपासून घट होत आहे, असे केंद्राने म्हटले आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २,११,२९८ रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक म्हणजे ३३,७६४ रुग्ण तमिळनाडूमध्ये आढळले. त्यापाठोपाठ केरळमध्ये २८,७९८ रुग्णांची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.