IndiaNewsUpdate : योगगुरू रामदेव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार, देशद्रोहाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी अॅ लोपॅथीच्या उपचारांवर वादग्रस्त भाष्य करणारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी रामदेव बाबा यांच्याविरूद्ध दिल्लीतील आयपी इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रामदेव कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवित आहे, हा एक गुन्हा आहे.
दरम्यान ‘आयएमए’कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहीण्यात आले असून यात बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे. यात बाबा रामदेवांना पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागायला सांगितले आहे.
आयएमएने म्हटले आहे कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला नागरिकांना कोरोना विरोधीत लस घेण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘पतंजलि’चे योगगुरू बाबा रामदेव कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही देशात १० हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचे सांगत फिरत आहेत. इतकेच नव्हे, तर अॅलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात कोरोना रुग्णांनी जीव गमावला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव यांचे हे विधान अतिशय दुर्दैवी आणि अशोभनीय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी. बाबा रामदेव लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी”, अशी मागणी ‘आयएमए’कडून करण्यात आली आहे.