CoronaMaharashtraUpdate : काळजी घ्या : कोरोनाची मुलांवर वक्रदृष्टी , तब्बल ३४ हजार ४८६ लहान मुलांना करोनाची लागण

मुंबईः चालू महिन्यात महाराष्ट्रात तब्बल ३४ हजार ४८६ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली असून दिवसेंदिवस हि संख्या वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान मार्च- एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. परिणामी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात हि दैनंदिन संख्या ५० हजारांवर गेली होती. आता मात्र, लॉकडाऊन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे ही रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. राज्यासाठी हि दिलासादायक बाब असली तरी दिनांक १ ते २६ मे यादरम्यान १० वर्षाच्या आतील ३४ हजार ४८६ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ मे रोजी लागण झालेल्या एकूण कोरोना बाधित मुलांची संख्या १ लाख ३८ हजार ५७६ होती. तर, २६ मेपर्यंत तो आकडा वाढून १ लाख ७३ हजार ०६० पर्यंत पोहोचला आहे. १ मे पर्यंत राज्यात ११ ते २० वयोगटातील रुग्णांची संख्या ३ लाख ११ हजार ४५५ इतकी होती. व २६ मेपर्यंत याच वयोगटातील रुग्णांची संख्या ३ लाख ९८ हजार २६६ इतकी झाली आहे.
दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी , या संदर्भात अद्याप कोणतेही शास्त्रीय संशोधन व अहवाल समोर आला नाही , त्यामुळे पालकांनी चिंता करण्याची गरज नाहीये, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.