CoronaMaharashtraUpdate : राज्यात 24,752 नवे रुग्ण , 23,065 रुग्णांना डिस्चार्ज , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76% टक्के

मुंबई : गेल्या 24 तासात राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 3,15,042 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76% टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर
मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 27,943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत रिकव्हरी रेट वाढला असला तरी कालपेक्षा आज दैनंदिन रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. काल 1,037 रुग्णांचे निदान झाले होते तर 1417 रुग्ण बरे होऊन घरी गेले होतं. तर आज 1362 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे शहरात आज 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 67 हजार 541 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 158 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 70 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 356 रुग्णांपैकी 1020 रुग्ण गंभीर तर 2124 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 751 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 60 हजार 516 इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 37 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 115 इतकी झाली आहे.