CoronaIndiaUpdate : देशात नव्या रुग्णांची संख्या कमी पण मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ

नवी दिल्ली : देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असून गेल्या २४ तासांतील मृत्यूची आकडेवारीही चिंताजनक आहे . दरम्यान महाराष्ट्र, दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर आता गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये करोना परिस्थिती बिकट बनली आहे. कोरोना आणि कोरोनानंतर उद्भवणाऱ्या व्याधींमुळे देशात मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत. देशात कोरोनामुळे प्राण गमवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे.
India reports 2,67,334 new #COVID19 cases, 3,89,851 discharges & 4529 deaths (highest in a single day) in last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 2,54,96,330
Total discharges: 2,19,86,363
Death toll: 2,83,248
Active cases: 32,26,719Total vaccination: 18,58,09,302 pic.twitter.com/iXabFEM0M5
— ANI (@ANI) May 19, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. असे असले तरी वाढत्या मृत्यू संख्येने देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी चार हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या दोन लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचली आहे.
सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात २८ हजार ४३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटकात ३० हजार आणि तामिळनाडूत ३३ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वालाख मृत्यूंची नोंद
दरम्यान ‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या कालावधी राज्यात वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. यातून डोळे विस्फारुन टाकणारी माहिती उजेडात आली आहे. ३३ जिल्हे आणि ८ महापालिकांद्वारे ७१ दिवसांमध्ये १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ ४ हजार २१८ जणांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.