IndiaNewsUpdate : देशात सहा ते आठ आठवडे लॉकडाऊनची गरज : बलराम भार्गव

नवी दिल्ली : करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाऊन ठेवला पाहिजे असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे ( ICMR ) प्रमुख बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसेच बंगळुरुचा समावेश आहे. बलराम भार्गव यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने करोनाला रोखण्यासाठी आधीच अनेक ठिकाणी लागू करण्यात आलेला लॉकडाउन किती काळ असला पाहिजे यावर भाष्य केले आहे. दरम्यान एकीकडे दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असल्याने देशात लॉकडाऊन जाहीर केला जावा अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र त्यासाठी इच्छुक नाही. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्राने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ, नवी दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.
बलराम भार्गव यांनी पुढे म्हटले आहे कि , “पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त असणाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लावला पाहिजे. पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून पाच टक्क्यांवर आल्यानंतर सर्व काही सुरळीत करु शकतो. पण तसे झाले पाहिजे, आणि हे सहा ते आठ आठवड्यांमध्ये होणार नाही हे नक्की. मला वाटते १० टक्क्यांची शिफारस मान्य कऱण्यास उशीर झाला. १५ एप्रिलला टास्क फोर्सने सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती.