GoaNewsUpdate : धक्कादायक : ऑक्सिजन अभावी गोव्याच्या शासकीय रुग्णालयात २६ जणांचा मृत्यू

पणजी : गोव्यातील बांबोळी येथील सर्वात मोठ्या सरकारी इस्पितळात ओक्सीजनचा नीट पुरवठा होत नसल्याने कोवीडग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारीही पहाटे दोन ते सहा या वेळेत २६ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 10 मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गोव्यात कोविड-19 चे एकूण 1,21,650 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 1,729 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे ऑक्सीजन अभावी मृत्यू होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळीच बांबोळीच्या इस्पितळाला भेट देऊन जाहीर केले होते. रुग्णांपर्यंत ओक्सीजन सिलिंडर वेळेत पोहचत नाही असे मुख्यमंत्री सावंत यांनी मान्य करुन सिलिंडर पुरवठादाराला इशारा दिला होता. सोमवारी मध्यरात्री नंतर चार तासांत २६ गोमंतकीय कोविडग्रस्त ओक्सीजन अभावी मरण पावले होते. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी इस्पितळाला भेट देऊन इस्पितळात सिलिंडर संख्या वाढवली जाईल असे देखील स्पष्ट केले होते.
दरम्यान मंगळवारी मध्यरात्री नंतर बांबोळीच्या इस्पितळातील १२२ क्रमांकाच्या वार्डमध्ये ऑक्सीजन पुरवठ्याच्या तुटवड्याची समस्या निर्माण झाली. रुग्णांना ओक्सीजन मिळेनासा झाला ते रुग्णांच्या काही नातेवाइकांनी आरोग्य मंत्र्याना वोट्स अप संदेश देखील पाठवले व मदतीची विनंती केली. मात्र, २६ रुग्ण चार तासांत दगावले. मध्यरात्री नंतर ऑक्सीजन समस्या का निर्माण होते व बळी का जातात याची न्यायालयाने चौकशी करून घ्यावी, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारीच जाहीरपणे सांगून सरकारमध्ये खळबळ उडवून दिली आहे.