IndiaCrimeUpdate : रेमडेसिविरचा काळाबाजार , विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यासह चौघांना अटक

जबलपूर : मध्य प्रदेश पोलिसांनी बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याच्या आरोपावरून असून चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याचाही समावेश आहे. सरबजीत सिंह मोखा असे या नेत्याचे नाव असून ते विश्व हिंदू परिषदेच्या नर्मदा विभागाचे आणि जबलपूरच्या सिटी रुग्णालयाचेही प्रमुख आहेत. इंदूर येथून ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळवत रुग्णालयामधील कोरोना रुग्णांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान जबलपूरचे पोलीस महानिरीक्षक भगवत सिंग यांनी म्हटले आहे कि , रेमडेसिविर तसेच ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठी आम्ही अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. काळाबाजार रोखण्यासाठी त्यांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहोत. या पथकाने हि कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये सरबजीत यांचे मॅनेजर देवेंद्र चौरसीया, सपन जैन यांचा समावेश आहे. औषध कंपन्यांसोबत डिलरशीपची जबाबदारी यांच्यावर होती. गुजरात पोलिसांनी बनावट रेमडेसिविरची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ७ मे रोजी सपन जैन यांना जबलपूर येथून अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने सबरजीत यांना पदावरुन काढून टाकले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी असे म्हटले आहे.