CoronaIndiaUpdate : धक्कादायक : लसीचे दोन डोस घेऊनही सर्जनचे कोरोनामुळे निधन

दिल्ली: दिल्लीत कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही एका सर्जन डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. सर्जन डॉ. अनिल कुमार रावत असे मृत पावलेल्या डॉक्टरांचे नाव असून ते ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीच्या सरोज रुग्णालयात ही घटना घडली आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्चमध्येच त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना सांगितले होते कि , मी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळ मी लवकरच कोरोनावर मात करेन, असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला होता. १९९६ पासून डॉ. रावत सरोज रुग्णालयात कार्यरत होते. अतिशय सभ्य माणूस, उत्तम सहकारी अशी त्यांची ओळख होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता.
दरम्यान डॉ. अनिल कुमार रावत मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे होते, अशा शब्दांत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. पी. के. भारद्वाज यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. ‘मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमएस सर्जरी केली. आरबी जैन रुग्णालयातील युनिटमधून त्यांनी १९९४ मध्ये स्वत:च्या कारकिर्दीला सुरुवात केली. शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्यासोबत होते,’ असं भारद्वाज यांनी सांगितले .
डॉ . अनिल कुमार रावत यांना १० ते १२ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . सुरुवातीला ते घरीच आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना सरोज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. भारद्वाज आणि त्यांच्या पूर्ण टीमने रावत यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. ‘त्यांना वाचवण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र आम्हाला यश आले नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी हानी आहे,’ असे भारद्वाज म्हणाले.