MarathawadaNewsUpdate : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ दिवसांचा जनता कर्फ्यू

औरंगाबाद : बीड जिल्ह्याच्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दिनांक ८ मे पासून १३ मेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबचे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत.
राज्य सरकारने करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पारित केलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात १५ मे रोजी सकाळी सात पर्यंत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आठवड्यात शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आठ ते १३ मे पर्यंत सलग जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
आठ मे सकाळी सात ते १३ मे सकाळी सातपर्यंत जनता कर्फ्यू राहील. अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलली आहे, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात आज शुक्रवारी ६६० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून आज दिवसभरात एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.