MaharashtraNewsUpdate : परराज्यातील २० लाख नागरिक आणि कामगारांनी धरली परतीची वाट

मुंबई : देश आणि राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता , परराज्यातील नागरिक आणि कामगारांनी परतीची वाट धरली असून गेल्या अवघ्या पंधरा दिवसांत २० लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. यापैकी पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी १७ लाख नागरिकांनी प्रवास केला आहे, तर मध्य रेल्वेने राज्याबाहेर उत्तर भारतात आणि ईशान्येकडे सुमारे ३ लाख ५० हजार नागरिक गेले आहेत.
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता रेल्वे चालू असे पर्यंतच आपल्या गावाकडे परतण्याच्या उद्धेशाने १ ते १४ एप्रिल या कालावधीत पश्चिम रेल्वेने राज्याबाहेर जाणाऱ्या २३० गाड्या सोडल्या असून त्यातून १७ लाख नागरिकांनी प्रवास केला. दरम्यान परिस्थती सामान्य असताना २०१९ मध्ये याच काळात लांब पल्ल्याच्या २९० गाड्यांमधून २१ लाख नागरिकांनी प्रवास केला होता. मध्य रेल्वेच्या गाड्यांमधून गेल्या पंधरा दिवसांत ३ लाख ५० हजार प्रवासी उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांत गेले आहेत. याच काळात मध्य रेल्वेने २ लाख नागरिक परराज्यातून महाराष्ट्रात दाखल झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेने मुंबईतून उत्तरेकडील राज्यांमध्ये जाण्यासाठी दरदिवशी सरासरी १८ ते २० गाड्या सोडल्या आहेत. एका गाडीतून साधारणपणे १२०० ते १३०० नागरिकांनी प्रवास केला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जाण्यासाठी बुधवारी नियमित आणि वि’शेष अशा २६ गाड्या मध्य रेल्वेने सोडल्या होत्या.
दरम्यान राज्यांतर्गत प्रवासासाठी असलेल्या गाड्यांना प्रवासी संख्या मर्यादित आहे. अनेक गाड्या रिकाम्या धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने राज्यातील विविध भागात जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये सीएसएमटी ते गदग, पुणे ते नागपूर, पुणे ते अजनी या गाड्यांचा समावेश आहे.