IndiaNewsUpdate : गुजरात, झारखंडमध्ये २४ तास सुरु आहेत अंत्यसंस्कार !!

अहमदाबाद : कोरोनमुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली असून कोरोना झाल्यावर रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धडपड आणि रुग्णांचे निधन झाले तर स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची फरफट होत असल्याचे विदारक चित्र आहे. गुजरातमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु असून सुरत शहरात एका स्मशानभूमीत बुधवारी रात्री एका चितेवर पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षेत असलेल्या मृतदेहांची संख्या कमी व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे दरम्यान संपूर्ण गुजरातमध्ये अशीच परिस्थिती आहे.
विशेष म्हणजे सतत २४ तास स्मशानभूमीत अशा पद्धतीने अंत्यसंस्कार सुरू आहेत, तरीही मृतदेहांची संख्या कमी होत नाही. बहुतांश मृत्यू हे कोरोनाबाधेमुळे होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत पोहोचत असलेल्या मृतदेहांची संख्या आणि सरकारी आकडेवारी यांच्यात मोठी तफावत आहे. सूरत, वडोदरा, अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातील संख्या पाहिली तर रोज २५ मृत्यू होत असल्याचा दावा केला जात आहे परंतु प्रत्यक्षात मृत्यू किती तरी जास्त आहेत.
अशी आहे तफावत
मध्य गुजरातमधील वडोदरातील सगळ्यात मोठ्या एसएसजी रुग्णालयात गेल्या नऊ दिवसांत कोविड आयसीयूमध्ये कमीतकमी १८० जणांचा मृत्यू झाला. भडोचमध्ये आठ दिवसांत २६० कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाला. सरकार फक्त ३६ मृत्यूच झाल्याचे म्हणते. वडोदरातील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे आकडे पाहिले तर कोविड आयसीयूत सात ते १५ एप्रिल दरम्यान ९० मृत्यू झाले. प्रत्यक्षात चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आयसीयूत रोज किमान १५ जणांचा मृत्यू होत आहे.
दरम्यान एका आठवड्यात रोज किमान ५० कोरोना रुग्णांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात आहेत. दोन दिवसांत ही संख्या १०० झाली. राजकोट जिल्ह्यात आठ ते १४ एप्रिल दरम्यान कोविड रुग्णालयात २९८ पेक्षा जास्त मृत्यू झाले असले तरी सरकारी दप्तरात फक्त ५७ मृत्यूंची नोंद आहे. गुरुवारी राजकोटमध्ये इतर ८२ जणांचा मृत्यू झाला. सूरतमध्ये दोन मोठ्या स्मशानभूमीत पाच ते १३ एप्रिल दरम्यान रोज जवळपास ८० दाह संस्कार झाले. येथे तीन नव्या स्मशानभूमी सुरू केल्या गेल्या. तर नवनिर्मित पाल स्मशानभूमीत रोज किमान २०-२० अंत्यसंस्कार केले जात आहेत.
१० स्मशानभूमीत १०० अंत्यसंस्कार
वडोदरातील या दोन सरकारी रुग्णालयांत एका आठवड्यात ३५० जणांचा मृत्यू झाला. भडोचच्या स्मशानभूमीतील रजिस्टरमध्ये एका आठवड्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २६० जणांचे अंत्यसंस्कार केले गेले. जिल्ह्यात अधिकृत नोंद ही ३६ मृत्यूंची आहे. नर्मदा नदीच्या काठावर दाह संस्कार करणारे धर्मेश सोळंकी म्हणाले की, गेल्या एक आठवड्यापासून रोज २२-२५ कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे दाह संस्कार होत आहेत. रोज जवळपास साडेसात हजार किलोग्रॅम लाकडाचा पुरवठा होत आहे. अहमदाबादेत गेल्या चार दिवसांत दहा स्मशानभूमीत जवळपास १०० मृतदेहांवर दाह संस्कार झाला आहे.
झारखंडमध्येही चिंताजनक स्थिती
रांची : झारखंडमध्ये कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या रोज वाढत आहे. राजधानी रांचीत गेल्या दहा दिवसांत स्मशानभूमी आणि कब्रस्तानात मृतदेह येण्याची संख्या अचानक वाढली. मृतांची संख्या एवढी वाढली की, मुक्तिधामात अंत्यसंस्कार करण्यास जागा कमी पडत आहे. लोकांना अनेक तास प्रतीक्षा करून आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. याचा परिणाम असा झाला की, लोकांनी आता उघड्यावर चिता रचून अंत्यसंस्कार सुरू केले आहेत. एका ठिकाणी तर लोक रस्त्याच्या मध्ये चितेवर मृतदेह जाळतानाची छायाचित्रे समोर आली होती. स्मशानात जागा नाही म्हणून मुक्तिधामच्या समोर रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगमध्ये मृतदेह ठेवून अंत्यसंस्कार केले जात आहेत. १२ कोरोना संक्रमित मृतदेहांचा दाहसंस्कार घाघरात सामूहिक चितेवर केला गेला.
कब्रस्तानमध्येही लागल्या रांगा
रातू रोड आणि कांटाटोली कब्रस्तानमध्येही दफन करण्यासाठी लांब रांगा दिसल्या आहेत. सगळ्यात जास्त मृतदेहांचा दाहसंस्कार हरमूस्थित मुक्तिधाममध्ये केला जात आहे. हरमू स्मशानभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कार करणारे राजू राम यांनी म्हटले की, ‘मी असे भयानक दृश्य कधी पाहिले नाही. लोक आपल्या कुटुंबीयाच्या अंत्यसंस्कारांसाठी आर्जव करीत आहेत. अशी हृदयविदारक दृश्ये पाहून लोकांनी प्रशासनाकडे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. स्मशान घाटांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही म्हटले की, आम्ही अशी दृश्ये या आधी कधी पाहिली नाहीत. आधी रुग्णालयात खाट मिळण्यासाठी आटापिटा करावा लागला. आता अंत्यसंस्कार करण्यासही प्रतीक्षा करावी लागत आहे. ते म्हणाले की, कोरोनाबाबत सरकारने पर्यायी व्यवस्था करायला हवी.