MaharashtraNewsUpdate : राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांना “सर्वोच्च दणका” !!

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अत्यंत गंभीर आहे, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून लावली आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची याचिकाही फेटाळून लावल्याने राज्य सरकारलाही झटका बसला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. त्याविरोधात ही याचिका केली गेली होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा दणका बसला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आता अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयची टीम ही मुंबईत चौकशीसाठी दाखल झाली आहे. दरम्यान ज्यांनी आरोप केले आहेत ते काही तुमचे शत्रू नाहीत. परमबीर सिंह हे एकेकाळी तुमचा उजवा हात होते. या प्रकरणात वरिष्ठ अधि काऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत, असे न्यायमूर्ती कौल म्हणाले.
कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. कायदा हा सर्वांसाठी एक असतो. एखाद्या पोलिस आयुक्तांनी आरोप केले म्हणजे त्यांचे म्हणणे हे पुरावा होत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयाने युक्तिवाद फेटाळून लावत या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यामुळे अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार, हे आता निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आहेत. आता ते पुढे काय करणार, याकडे लक्ष आहे.
परमबीर सिंह यांना निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटवण्यात आले . यावरून परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुखांनी मुंबईतून १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्रात म्हटले होते . तसेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्याविरोधात परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची सूचना दिल्यानंतर या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. सीबीआय चौकशीविरोधात त्यांनी याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्या आहेत. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले आहे. यामुळे या प्रकरणी अनिल देशमुखांना चांगलाच दणका बसला आहे.