MumbaiNewsUpdate :सचिन वाझेची चौकशी करण्यासाठी कोर्टाची सीबीआयलाही परवानगी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले असताना एनआय कोठडीत वाढ करण्यात आली. कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा असे कोर्टाने सीबीआयला सांगितले आहे. दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mumbai: Suspended Mumbai Police officer Sachin Waze brought to Special NIA Court. pic.twitter.com/7Z39pVDxax
— ANI (@ANI) April 7, 2021
अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.
दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत आणि नंतर ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली होती.
वाझेंची महागडी गाडी जप्त
एनआयएने सोमवारी महागडी दुचाकी जप्त केली. एका महिलेच्या नावे नोंद असलेल्या या दुचाकीचा वापर मुख्य आरोपी सचिन वाझे करीत होते, असा दावा ‘एनआयए’ अधिकाऱ्याने केला. गेल्या वर्षी वाझे यांनी दुचाकीवरून काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला होता. त्या सफरीत वाझे यांनी हीच दुचाकी वापरल्याचा संशय आहे. ‘एनआयए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुचाकी दमण येथून जप्त करण्यात आली. या प्रकरणात अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळेल्या स्कॉर्पिओसह आठ महागड्या गाड्या ‘एनआयए’ने हस्तगत केल्या आहेत. त्यात वोल्वो गाडीचाही समावेश असून ती दमण येथून जप्त करण्यात आली होती.
दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट नावाचा वापर करत वाझे यांच्यासाठी एक खोली आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान ‘एनआयए’ला मिळाली. या माहितीत तथ्य आढळले असून सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असेही स्पष्ट झाले. एका सीसीटीव्ही चित्रणात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना वाझेंसोबत एक महिला आढळली. सोमवारी जप्त करण्यात आलेली दुचाकी याच महिलेच्या नावे नोंद होती, असे समजते.