MumbaiNewsUpdate : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची एनआयएकडून चौकशी

मुंबई : एनआयएच्या पत्रानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आपला जबाब देण्यासाठी एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी एनआयएचे अधिकारी करीत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
Mumbai: Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh arrives at the NIA office, in connection with the Antilia bomb scare case pic.twitter.com/qrUdulVzAj
— ANI (@ANI) April 7, 2021
निलंबित एपीआय सचिन वाझे याच्या अटकेनंतर त्याने दिलेले जबाब आणि अधिकारी म्हणून परमबीर यांचा त्याच्याशी असलेला संबंध यावर एनआयए त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत . मनसुख यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती असे सांगितले होते .
दरम्यान मयत मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.