NandedNewsUpdate : नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक : अशोक चव्हाण

नांदेड : नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन त्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई नक्की करेल अशा शब्दात नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नांदेडमध्ये शीख समाजाच्या होला मोहल्ला या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात दंगेखोरांनी पोलिसांवर जीवघेणे हल्ले केले या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र धिक्कार होत असताना अशोक चव्हाण यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
नांदेडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे अनेक पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच, पोलिसांनी आत्तापर्यंत सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे या प्रकारानंतर काल रात्रीपासून नांदेडमध्येच तळ ठोकून होते. यासंदर्भात सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेत घडल्या प्रकाराची माहिती दिली. “मिरवणूक काढली जाणार नाही हे ठरले होते . मात्र, तरीदेखील काही मंडळींनी बॅरिकेड्स तोडली. बाहेर पडलेल्या काही लोकांनी पोलिसांवर निर्घृण पद्धतीने हल्ले केले. त्यातले काही पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. कालची घटना अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे”, असे ते म्हणाले.
“या सर्व प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. ज्या पद्धतीने पोलिसांवर तलवारीने हल्ले झाले, ते भयानक आहे. पालकमंत्री या नात्याने मी काल रात्री नांदेडमध्ये आलो. सकाळी एसपी, आयजी, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. चौकशीअंती जे स्पष्ट होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. ही घटना घडणे दुर्दैवी आहे”, असेही अशोक चव्हाण यांनीम्हटले आहे.