AurangabadNewsUpdate : “…साहेब , जरा बाजूला थांबा” म्हणताच राज्यमंत्री भडकले तर माहिती विचारली म्हणून पोलीस निरीक्षक खवळले !!

औरंगाबाद : साहेब जरा बाजूला थांबा असे म्हणतात राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अमलदारावर भडकले त्या नंतर बराचवेळ हा सर्व गोंधळ सुरू होता ही घटना आज सकाळी क्रांतिचौक जवळील मतदान केंद्रावर घडली अशी माहिती पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दिली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी त्या पोलिसांवर केला. यावर भडकलेल्या पोलिसांनी सत्तार यांना चौकशी करा, असे उत्तर दिल्याने वादावादी वाढली यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांना फोन केला असता.त्यांनी माझ्याकडे तुमच्याशी बोलण्यास वेळ नाही. तुम्ही कुठुन माहिती घ्यायची ती घ्या अशी मुक्ताफळे उधळली. हा प्रकार पोलिसआयुक्त डाॅ निखील गुप्ता यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी देवकरांना समजवतो असे सांगत प्रकरणी राज्यमंत्री सत्तारांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याचा खुलासा केला.
आज सकाळी 8 वाजेपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागा साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.क्रांतिचौक जवळील विभागीय सह निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात मतदानाचा केंद्र असून आज सकाळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तेथे आले. पदाधिकारी व इतर उमेद्वारासह ते केंद्राजवळ चर्चा करीत थांबले असता त्यावेळी तेथे बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस नाईक भोकरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना आपण थोडं बाजूला जाऊन थांबा वरिष्ठ आम्हाला बोलतील असे सांगत बाजूला जाण्याची विनंती केली. भोकरेंचे हे शब्द एकताच त्यावर सत्तार यांचा चांगलाच पारा चढला. तू सांगणारा कोण, मला ओळखत नाही का, असे म्हणत तू विरोधकांचे पैसे खाल्ले आहेत, असा आरोप केला. त्यावर संतप्त झालेल्या पोलिसाने मी पैसे खाल्ले असतील, तर चौकशी करा, असे थेट उत्तर दिले.
यावरून शाब्दिक चकमक वाढत गेली. उपस्थित नेते मंडळी व पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हा प्रकार थेट पोलिस आयुक्तांपर्यंत गेला. त्यांनी तात्काळ याठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सत्तार बंदोबस्तावरील पोलिसांवर भडकले सत्तार यांच्या पहाडी आवाजाने परिसरात बराच गोंधळ उडाला बाजूलाच असलेले पोलीस धावत तेथे आले तर राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मध्यस्थी केली. तर एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सत्तार यांची समजूत काढली व प्रकरण शांत झाले.
काही वेळाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ,पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त हनुमंत भापकर सह काही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शीघ्र कृती दलासह विविध विभागातील पथके घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.