MaharashtraCoronaUpdate : या शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत सतर्कतेचे आदेश

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे दिसत असून राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत . राज्यातील मुंबईसह ठाणे , वसई , विरार , कल्याण ,डोंबिवली , पुणे , पंढरपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, यवतमाळ , अकोला, वर्धा या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढले आहेत.
या सर्व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या असून मास्क न घालणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांना २०० रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत दंड लावण्यात येत आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणाऱ्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोना रुग्णांना ओळखण्यासाठी बाजारपेठा, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकांवर चाचणी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. गरज भासल्यास खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिगृहित करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या आदेशानुसार लग्नसमारंभ व मेळावे बंदिस्त जागेत तसेच 50 टक्के उपस्थितीत होतील. अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून या आदेशाचे उल्लंघन कारणावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान नागपुरात प्रशासनाने कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधी परवानगी बंधनकारक केली आहे. एका इमारतीत पाच रुग्ण आढळले तर इमारत सील करण्याचे आणि फ्लॅट सील करण्याचे आदेश दिले आहेत.
यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रस्त्यावर उतरुन पाहणी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर देत रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन केले आहे. तर औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या नव्या आदेशानुसार 10 आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद असणार आहेत. होम क्वॉरंटाईनवर भर देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील दहा गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीच्या पंढरपुरातील माघी यात्रेत दिंड्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर अकोला शहरात रात्रीचा कर्फ्यू जारी लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे.