विजयवाडा विमानतळावर प्रवासी विमान विद्युत खांबाला धडकले…

एअर इंडियाचे एक विमान विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना एका विद्युत खांबाला धडकले आहे. या विमानात 64 प्रवाशी असून हा अपघात आज दुपारी 4.50 वाजता घडला आहे. यावेळी विमानात बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित असून मोठी जीवितहानी टळली आहे.
हे विमान एअर इंडियाचे असून गन्नवरममधील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. त्यावेळी हे विमान एका विद्युत खांबाला धडकले. विमानातील सर्व 64 प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती विमानतळाचे संचालक जी मधुसूदन राव यांनी दिली आहे. आज दुपारी 4.50 वाजता, एअर इंडियाचे एक्सप्रेस विमान 64 प्रवाशांना घेवून दोहाहून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे दाखल झाले होते. यावेळी विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 64 प्रवाशांपैकी 19 प्रवाशी उतरणार होते. यावेळी हे विमान लँडिंगनंतर 5 नंबरच्या धावपट्टीकडे जात असताना या विमानावरील वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान विद्युत खांबावर जावून आदळले. मुख्य उड्डाण धावपट्टीवरून 5 व्या क्रमांकांच्या धावपट्टीकडे जाताना वैमानिकाने मधल्या पिवळ्या पट्टीऐवजी धावपट्टीवरील कडेची पिवळ्या पट्टीवरुन विमान पुढे नेले. परिणामी, फ्लाइटच्या उजव्या विंगला विद्युत खांबाची जोरदार धडक बसली. या धडकेत विजेचा खांब जमीनीदोस्त झाला. तर विमानाच्या उजवी विंगचंही किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी तसेच क्रु मेंबर्स सुरक्षित आहेत.