JalnaNewsUpdate : “ती” विहीर बनली “मौत का कुव्वां…” , तिसऱ्या दिवशीही कार विहिरीत बुडाली , माय- लेकी ठार

मातेने जीपच्या खिडकीतून फेकल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकली प्राण वाचले !!
जालना । जालना -देऊळगाव रस्त्यावरील जामवाडी येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून मायलेकींचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे याच विहिरीत बीडच्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वीच घडली होती. त्यानंतर आज (रविवारी) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून हा अपघात झाला. दरम्यान आईने हातातील दिड वर्षाच्या मुलीला प्रसंगावधान राखून बाहेर फेकल्याने तिच्यासह दोन जण वाचले आहेत. वेदिका फांदडे असे या चिमुरडीचा नाव आहे.
या अपघातग्रस्त कारमधील सर्व प्रवासी वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील सिंगडोह गावातील आहेत. आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथून जालना मार्गे वाशिमकडे जाण्यासाठी हे कुटुंब कारमधून निघाले होते. चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्यांची कार जामवाडी येथे जालना ते देऊळगाव राजा मार्गावरील विहिरीत कोसळली. विशेष म्हणजे कार विहिरीकडे जात असल्याचे लक्षात येताच महिलेने खिडकीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला बाहेर फेकले; त्यामुळे ती वाचली आहे. कार विहिरीत पडल्यानंतर कार चालक गोपाल विठ्ठल फांदडे (वय 40) आणि जय गुणवंत वानखेडे (वय 17) हे दोघेजण पोहून वर आले. विविध विहिरीतून वर आल्यानंतर त्यांनी जाणार येणाऱ्यांना आवाज देत मदतीची याचना केली. ग्रामस्थ आणि पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून तब्बल दोन ते तीन तासानंतर कार विहिरीतून बाहेर काढली. कारमध्ये आरती गोपाल फांदडे (वय 35) आणि मुलगी माही गोपाल फांदडे (वय 5) यांचे मृतदेह आढळून आले आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
जामवाडी येथे एका ढाब्यासमोर रस्त्याच्या शेजारीच हि विहीर आहे. रस्ता वळणदार असल्याने या भागात असलेली विहीर धोकादायक बनली आहे. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात होऊन वाहन विहिरीत कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत.