PuneNewsUpdate : पुण्यातील पोलीस होताहेत आता डिजिटल , हद्दीचा प्रश्न मिटला

पुणे । पुण्यात आता पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅबलेट’ उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळे नागरिकांना विनाविलंब मदत उपलब्ध करून देताना पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या मर्यादा संपुष्टात येत आहेत. या योजनेनुसार घटनास्थळापासून जवळ असलेल्या मार्शल कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षातून पोलिस मार्शलवर नियंत्रण ठेवले जाणार असून, त्यांच्यातील सर्व व्यवहार हे टॅबद्वारेच होणार आहेत.
दरम्यान राज्यात आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांकडून तातडीने मदत मिळण्यासाठी ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना या नंबरवर संपर्क साधवा लागेल. मात्र, यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली जाणारी कार्यवाहीदेखील पूर्णत: बदलणार आहे. ही गोष्ट सामान्य नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत कर्मचाऱ्यांना ‘११२’ सेवा आणि ‘टॅब’ वापराचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले.
नव्या योजनेनुसार सध्या पोलिस नियंत्रण कक्षाला एखादी घटना कळवल्यानंतर, तेथून संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिली जाते. त्यानंतर तेथून ‘मार्शल’ घटनास्थळी जातात. मात्र, नवीन योजनेनुसार सर्व पोलिस ठाण्यांतील ‘मार्शल’ कर्मचारी नियंत्रण कक्षाशी ‘जीपीएस’मार्फत जोडलेले असणार आहेत. एखादी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातूनच त्या घटनास्थळापासून जवळ असलेल्या ‘मार्शल’ कर्मचाऱ्यांस थेट माहिती कळवली जाईल. यासाठी ‘मार्शल’ कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक ‘टॅबलेट’ दिला जाणार आहे. त्या ‘टॅब’द्वारेच पुढील सर्व व्यवहार पार पाडले जाणार आहेत
नवीन पोलिस इमर्जन्सी सर्व्हिससाठी राज्यभरातील पोलिस ठाण्यांसाठी एक हजार ५०० कार आणि दोन हजार २०० दुचाकी वाहने खरेदी करण्यात येत आहेत. यातील काही वाहने पुण्यात दाखल झाली आहेत. या सेवेअंतर्गत कारमध्ये मोठा ‘टॅब’ आणि दुचाकीवरील मार्शल कर्मचाऱ्याकडे छोटा ‘टॅब’ दिला जाणार आहे.