पंतप्रधान मोदी संसदेत बोलले, हीच मोठी गोष्ट – नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असावी, असे म्हटले होते, याचा हवाला दिला. त्यावरून नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रस्तावित केलेला वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) जशाचा तसा का मंजूर केला नाही, अशी विचारणा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी इतरवेळेस संसदेऐवजी सभांमधूनच अधिक बोलत असतात. ते संसदेत बोलले, हीच मोठी गोष्ट आहे. कृषी कायद्याचे समर्थन करताना पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे उदाहरण दिले. असे असेल, तर मग मनमोहन सिंग यांनी आणलेला जीएसटी कायदा जशास तसा का नाही स्वीकारला, असा प्रश्न विचारून पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहेत. अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील, असे स्पष्ट केले होते. विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याचा आदर राखत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ती कायम राखावी, असे आवाहनही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केले
सगळ्यांनी आपापला पक्ष वाढवावा. सर्वांना तो अधिकार आहे. आमचा पक्षही तळागाळापर्यंत नेऊ, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावरील भव्य कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन लोटस’ ची शक्यता फेटाळून लावली आहे. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष राज्यात नावालाही उरणार नाही, असा दावाही पटोले यांनी केला आहे.