MaharashtraNewsUpdate : गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे भाजप -सेनेत पुन्हा जुंपण्याची चिन्हे !!

मुंबई । सिंधूदुर्गच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे भाजप सेनेत पुन्हा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत . अमित शहा यांच्या टीकेला खा. अरविंद सावंत आणि खा . संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे . शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांचे नाव न घेता निशाणा साधताना म्हटले आहे कि , ‘1975 साली रजनी पटेल यांनी आणि 90 च्या दशकात मुरली देवरा यांनी काही काळातच शिवसेना पक्ष नामशेष होईल अशी भाषा केली होती. 2012 अशाच प्रकारचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. पण दोन्ही वेळी शिवसेनेने पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने राजकारणात आपलं स्थान भक्कम केलं होते. जय महाराष्ट्र !’
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना या सरकारची तुलना तीन चाकांशी केली होती. जे वेगवेगळ्या दिशेने प्रवास करत असल्याचे म्हटले होते . त्याचबरोबर अमित शहांनी काश्मीर प्रश्न आणि राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेनेने सावध भूमिका घेतल्याचे म्हटले आहे. शिवाय शिवसेना पक्षाने सावध भूमिका घेत बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा धुळीस मिळवली असल्याचे ही त्यांनी यावेळी म्हटले होते.
कोकणात आलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरही केंद्रीय गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, कोकणात जेव्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत होते? ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची राज्याला गरज होती, तेव्हा मुख्यमंत्री साखर कारखान्यातील फायद्याबद्दल चर्चा करण्यात व्यस्त होते. देवेंद्र फडणवीस नसते तर शिवसेनेचं अस्तित्वही नसते , अशी विखारी टीकाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.