राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ, पवारांच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल पासून नाना पटोले राजीनामा देतील अशी चर्चा सुरु झाली होती त्याप्रमाणे काँग्रेस हायकमांडच्या आदेशाने आपण विधानसभेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा करून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे झिरवाळ यांच्याकडे सुपूर्द केली. दरम्यान या रिक्त पदावरून पुन्हा एकदा तिन्हीही पक्षांना एकत्रित बसून चर्चा करावी लागेल अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी टाकल्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
दरम्यान माध्यमांशी बोलतांना पाटोले म्हणाले की , “पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितल्या प्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रिपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितले नाही. पक्ष आदेश देईल. त्याचे मी पालन करेन” तसेच, विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना मी त्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली याचा अभिमान आहे, तुम्ही राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार ? या प्रश्नावर ते म्हणाले की, “हा निर्णय तीन पक्षाचे नेते घेतील. तीन पक्षांचे प्रमुख या संदर्भात बैठक करुन, निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळातच होते”.
पवारांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी हे अध्यक्षपद सोडण्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडतानाही या तिघांमध्ये चर्चा होईल असे सांगितले. नव्या बदलामध्ये आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाची निर्मिती करून ते काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या सगळ्याविषयी काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असून केवळ चांगली खाती पदरात पडणार असतील तरच काँग्रेसचे नेते या चर्चेला तयार होतील असे सांगण्यात येत आहे. आज दुपारपासून काँग्रेसने सोडलेल्या या पदावर वरपुडकर , थोपटे आणि अमीन शेख यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या तर काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळेल आणि शिवसेना विधानसभेचे रिक्त पद आपल्याकडे घेईल अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमातून येत असतानाच सायंकाळी या विषयावरून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एंट्री केल्यामुळे आता काय होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान नव्या उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर आपली सावध प्रतिक्रिया देताना विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार या बातमीत कुठलेही तथ्य नसल्याचे सांगत नॉट रिचेबल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसमध्येही सुरु आहे रस्सीखेच…
मुळात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून मोठी रस्सीखेच चालू असतानाच आता हे पद नाना पटोले यांना मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झालेली आहे. दरम्यान काँग्रेस नेतृत्वाला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये समन्वय साधण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.
शरद पवार नेमके काय म्हणाले
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी ‘ऑफ द रेकॉर्ड’ गप्पा मारताना म्हटले कि , काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचे असल्याने आता ते खुले झाले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार? यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. पवारांनी अत्यंत मोजक्याच शब्दात पण अत्यंत मुद्देसुद भाष्य केले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शिवसेनेची गोची होणार हे आता उघड आहे .