अवास्तव मागण्यांमुळे वंचित बहुजन आघाडीशी युती नाही , त्यांचा फायदा भाजपला : सुशीलकुमार शिंदे

माझ्या विरोधात भाजपकडून धर्माच्या नावावर साधूगिरी करणारा उमेदवार दिलाय. तर ज्यांनी घटना लिहिली त्यांच्या नातवाकडून जातीयवादी आणि दंगली पसरवणाऱ्यांसोबत आघाडी करून धर्मनिरपेक्ष घटनेचा खून केलाय, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आघाडीच्या मेळाव्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र सोडले. पंढरपूर येथील संत तनपुरे मठात काँग्रेस आघाडीच्यावतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भारत भालके, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मी पण चर्चेला होतो. मात्र अवास्तव मागणीमुळे ते सोबत आले नाहीत. आंबेडकरांची भाजपची बी टीम असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपात तथ्य आहे, असं शिंदे म्हणाले. आंबेडकर यांचा पक्ष फक्त मतं कापण्याचं काम करीत असून याचा फायदा भाजपाला मिळणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्याने आपल्याला दुःख आहे. ज्यांनी गोध्रा कांडानंतर मोदींना वाचवले त्या आडवाणींचं खच्चीकरण केलं जातंय, असं शिंदे म्हणाले.
काँग्रेसकडे नेत्यांचा स्टाॅक असून गेलेले नेते त्यांना धर्मनिरपेक्षता शिकवून परत येतील असा टोला शिंदेंनी लगावला. सपना चौधरींच्या नावाने भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या असून आजवर हेमा मालिनींच्याविरोधात टक्कर देणारे समोर उभे ठाकले नसल्याने भाजपचा तिळपापड होत असल्याची टीका, सुशीलकुमार शिंदे यांनी केली.