#FarmerTractorRally : पोलिसांनीच दाखवला त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग – नवाब मलिक

प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर परेडला काल हिंसक वळण लागले. त्यात मोठ्या संख्येने पोलीस व आंदोलक जखमी झाले. या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. तसेच महाराष्ट्रातही यावरुन राजकारण रंगले आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचेही स्पष्ट केले होते. हा मोर्चा दिल्लीत आला तेव्हा लाल किल्ल्याच्या दिशेने ट्रॅक्टर परेड गेली. तेव्हा पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता. हा मोर्चा दिल्लीत आल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला, पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला हे खोट आहे, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता, असे नमूद करतच भाजपशी संबंधित दिप सिद्धुने तिथे ध्वज फडवला असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, दीप सिद्धुने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, दिल्लीत घडलेल्या हिंसाचारानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावर नवाब मलिक यांनी शरद पवार हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलीस दलात पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार यांना माहीत नाही काय?, असा सवाल केला आहे.