MaharashtraNewsUpdate : मुंबईत “एपीआय”चा तर औरंगाबादेत तरुणाचा मांजामुळे कापला गेला गळा !!

मांजामुळे गळा कापल्याच्या घटना मुंबई आणि औरंगाबादेत घडल्या यापैकी मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांचा जीव शनिवारी थोडक्यात बचावला. दुचाकीवरून न्यायालयात जात असताना नायलॉन मांजाने त्यांचा गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने राकेश गवळी बचावले. त्यांच्या गळ्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करून १० टाके टाकण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव बचावला.
राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. पोलिसाच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावून आले. त्यांनी गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. याबाबत समजताच तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी त्यांना व्होकार्ट रुग्णालयात हलविले.
औरंगाबाद शहरातही नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा
औरंगाबाद शहरातही दुचाकीने घराकडे जाणा-या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास टाऊन हॉल उड्डाणपुलासमोर घडली. यानंतर तरुणाला नागरिकांनी तत्काळ घाटीत दाखल केले. त्याच्या गळ्याला आठ टाके देण्यात आले आहेत. शेख रईस शेख मुनीर (३०, रा. आरेफ कॉलनी) हा मित्रांसोबत दुचाकीने भडकल गेटहून घराकडे जात होता. त्याचवेळी टाऊन हॉल उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. त्यामुळे तो दुचाकीवरुन खाली पडला.
हा अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ घाटीत दाखल केले. त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करुन आठ टाके देण्यात आले आहेत. त्याच्यावर सध्या घाटीत उपचार सुरू आहेत. दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असताना तसेच पोलिसांनी वेळोवेळी आवाहन करुन देखील मांजाची विक्री तेजीत सुरू असल्याचे या घटनेवरुन समोर आले आहे. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.